उमरगा नगरपरिषदेवर शिवसेना व काँग्रेस पक्षाची बहुमताने सत्ता स्थापन झाल्यानंतर सकल मातंग समाज उमरगा, लहुजी शक्ती सेना, बहुजन रयत परिषद व बहुजन समाजाच्या वतीने श्री. बालाजी माधवराव गायकवाड यांची उमरगा नगरपरिषदेवर स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
उमरगा व लोहारा तालुक्यात सामाजिक कार्याची भक्कम परंपरा जपणारे, कोरोना काळात गोरगरीब नागरिकांना खाऊचे किट वाटप करून दिलासा देणारे, सुशिक्षित विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे तसेच गेल्या ३० वर्षांपासून विविध क्षेत्रांत कार्यरत राहून सर्वसामान्यांच्या प्रश्नांची अचूक नाळ ओळखणारे संवेदनशील व कार्यकर्तृत्वशील व्यक्तिमत्त्व म्हणून श्री. बालाजी माधवराव गायकवाड यांची ओळख आहे. बहुजन समाज व मातंग समाजातील सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी सातत्याने समाजहिताचे कार्य केले आहे.
मातंग समाजाला आजवर कोणत्याही निवडणुकीत थेट उमेदवारी मिळालेली नसल्याने सामाजिक समतोल राखण्यासाठी व बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी शिवसेना व काँग्रेस पक्षाने श्री. बालाजी माधवराव गायकवाड यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याचा फायदा भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या संदर्भात शुक्रवार दि. 2 जानेवारी 2026 रोजी शासकीय विश्रामगृह, उमरगा येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत सकल मातंग समाज, लहुजी शक्ती सेना, बहुजन रयत परिषद व बहुजन समाजाच्या वतीने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा धाराशिव जिल्ह्याचे माजी खासदार प्रा. रवींद्रजी गायकवाड, शिवसेनेचे उपनेते तथा उमरगा–लोहारा तालुक्याचे माजी आमदार मा. श्री. ज्ञानराजे चौगुले, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मा. श्री. जितेंद्र दादा शिंदे आणि उमरगा नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष मा. श्री. किरण भैया गायकवाड यांच्याकडे शक्ती प्रदर्शन करत निवेदन देण्यात आले.
याच बैठकीत लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विष्णू भाऊ कसबे यांच्या आदेशाने लहुजी शक्ती सेनेच्या उमरगा तालुकाध्यक्षपदी श्री. तुळशीराम महादेव देडे यांची निवड जाहीर करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश सचिव श्री. दिलीप गायकवाड व बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सरचिटणीस श्री. ईश्वर क्षीरसागर होते.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भाऊ बनसोडे, बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष योगेश येडाळे, उमरगा–लोहारा तालुका प्रवक्ता अॅड. सुखदेव होळीकर, जनआधार मोर्चाचे सिताराम कांबळे, तालुका उपाध्यक्ष राम कांबळे, विष्णुपंत खंडागळे, बहुजन रयत परिषदेचे तालुका उपाध्यक्ष मारुती थोरात, बालाजी कांबळे, बी. एस. गडकर, गणेश बनसोडे, विजय गायकवाड, अमित दुंणगे, लहुजी शक्ती सेनेचे मीडिया प्रमुख मुकेश जोगदंड, ओम जोगदंड, बहुजन रयत परिषदेच्या उमरगा तालुका महिला सचिव मीराताई वाडेकर, महिला संघटक वंदा ताई कांबळे, कोमल ताई गायकवाड, बबिता मदने, शेख ताई व केरूबाई तोरडकर यांच्यासह सकल मातंग समाज, लहुजी शक्ती सेना व बहुजन रयत परिषदेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व स्तरांतून होत असलेल्या या मागणीमुळे श्री. बालाजी माधवराव गायकवाड यांच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.










