हॅलो उमरगा | दिनांक १२ मार्च २०२६ रोजी जेकेकुऱवाडी येथे ग्रामविकास आणि पंचायतराज व्यवस्थेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत भव्य जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पंचायतराज व्यवस्थेचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
या विशेष कार्यक्रमाला लोकप्रिय मराठी मनोरंजन कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील प्रसिद्ध कलाकार शिवाली परब आणि पृथ्वीक प्रताप यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांच्या आगमनामुळे कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. | हॅलो उमरगा
कार्यक्रमाचे आयोजन जेकेकुऱवाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने करण्यात आले. त्यांनी गावाच्या विकासासाठी आणि ग्रामस्थांमध्ये शासकीय योजनांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या मेळाव्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान कलाकारांनी ग्रामस्थांशी संवाद साधत शिक्षण, स्वच्छता, ग्रामविकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी आपल्या कारकिर्दीतील अनुभव सांगून युवकांना प्रेरणा दिली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे स्वागत केले.
मेळाव्यात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. पंचायत राज व्यवस्थेमुळे गावाच्या विकासाला कशी गती मिळू शकते याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान युवक व विद्यार्थ्यांनी कलाकारांसोबत फोटो काढण्याची मोठी उत्सुकता दाखवली.
या जनजागृती मेळाव्यामुळे ग्रामस्थांमध्ये विकास योजनांविषयी जागरूकता निर्माण झाली असून ग्रामविकासासाठी नागरिकांचा सहभाग वाढण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.








