शिवजयंती उत्सवापुरती नव्हे, तर समाजोपयोगी कृतीतून साजरी व्हावी : किशोर माडजे यांची भूमिका

मुळज येथे शिवजयंतीचे औचित्य साधत सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात बोलताना समितीचे सदस्य व शाळेचे माजी विद्यार्थी मा. किशोर माडजे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केवळ उत्सवापुरती मर्यादित न ठेवता सामाजिक व विधायक उपक्रमांद्वारे साजरी केली, तरच ती खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरेल. “शिवरायांच्या कार्याला अभिवादन करायचे असेल, तर समाजहिताची कामे करणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणवून घेण्याचा अधिकार मिळवू,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, गावातील शाळा आणि येथील विद्यार्थी ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, आवश्यकतेनुसार शाळेसाठी मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा. वसंत जाधव यांनी मनोगतातून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याची गरज व्यक्त केली. हा संघ उभारण्यासाठी समितीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. “शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान” या उक्तीचा संदर्भ देत, गाव आणि शाळा यांनी विद्यार्थीहित डोळ्यासमोर ठेवून एकत्रित प्रयत्न केल्यास शाळेची प्रगती अधिक वेगाने होईल, असे ते म्हणाले. तसेच, गावातील विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील शाळेतच प्रवेश घ्यावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक व शालोपयोगी शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. उन्हाळ्याचा प्रारंभ लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांना टोप्यांचे वितरणही करण्यात आले.

या कार्यक्रमाला सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य, शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकर बिराजदार यांनी केले, तर आभारप्रदर्शन सचिन सर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राम हत्तरगे, बालाजी बिराजदार, लहू जाधव, गणेश मुळजे, भैरू जाधव, सुमित जेवळे, नागेश शिंदे, लखन मिरकले, गणेश पांचाळ, अविनाश चव्हाण, दयानंद चव्हाण, गिरीश पांचाळ, कृष्णा पांचाळ, श्री बिराजदार आदींनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now