उमरगा (प्रतिनिधी) :
बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी पंचायत समिती सभागृह, उमरगा येथे आमदार प्रविणजी स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष टंचाई आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील गावनिहाय पाणीटंचाईची परिस्थिती, टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे प्रलंबित प्रस्ताव, विहीर अधिग्रहणाची सद्यस्थिती, चारा छावण्यांचे नियोजन तसेच जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या आणि अपूर्ण राहिलेल्या पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर उपलब्ध होणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र आहे, अशा गावांचे टँकर प्रस्ताव तातडीने मंजूर करून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करावा. आवश्यकतेनुसार विहिरींचे अधिग्रहण करून पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी. तसेच जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण असलेली नळ पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करून त्या कार्यान्वित कराव्यात, अशा सूचना आमदार स्वामी यांनी दिल्या.
यावेळी बोलताना आमदार प्रविणजी स्वामी म्हणाले की, “पाणीटंचाईचा प्रश्न हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि जनावरांच्या जगण्याशी निगडित आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. टँकरचे प्रस्ताव विनाविलंब मंजूर करून शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे. टंचाई निवारणाच्या कामात कोणताही प्रशासकीय हलगर्जीपणा किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.”
बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनीही आपल्या भागातील पाणीटंचाई, पाणीपुरवठ्यातील अडचणी आणि प्रलंबित विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. पाणीपुरवठा योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, टँकरच्या माध्यमातून होणारा पुरवठा आणि विहीर अधिग्रहणाच्या प्रक्रियेवर नियमित लक्ष ठेवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती
या आढावा बैठकीस पंचायत समिती सभापती आकांक्षाताई चौगुले, उपसभापती रेखा इंगळे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार गोविंद येरमे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, उमरगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंदर बोदर, मुरूम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) सचिन रेखुळवाड, API श्रीकांत भराटे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, राजेंद्र समाने, काँग्रेसचे सतीश जाधव, नगरसेवक विशाल कानेकर, पंचायत समिती सदस्य दगडू मोरे, तुकाराम जाधव, स्नेहा जाधव, महानंदा कलबुर्गे यांच्यासह महावितरण, जलसंपदा व पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अभियंते, अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला स्पष्ट निर्देश मिळाल्याने आता प्रत्यक्ष उपाययोजनांना किती वेग येतो आणि टंचाईग्रस्त गावांपर्यंत दिलासा किती लवकर पोहोचतो, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
उमरग्यात पाणीटंचाईचा आढावा; नागरिकांच्या पाणीप्रश्नात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही – आ. प्रविण स्वामींचा अधिकाऱ्यांना इशारा!

by HelloOmerga
Updated On: November 4, 2026 3:13 pm







