ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचा अभिनव उपक्रम; तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी व मार्गदर्शन
उमरगा | प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटल, उमरगा यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘१०० Saturdays – १०० गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिर’ या अभिनव अभियानाला सुरुवातीलाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभियानांतर्गत शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी तुरोरी येथे आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य शिबिर नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडले.
तुरोरी येथील महादेव मंदिर–नाथ मंगल कार्यालय येथे आयोजित या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्य तपासणी, आजारांचे प्राथमिक निदान तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचार व पुढील काळजीबाबत मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
शिबिरात जनरल मेडिसिन, छाती विकार, हृदयविकार, पोट व किडनी विकार, मधुमेह, स्त्रीरोग व प्रसूती, वंध्यत्व निवारण तसेच विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया यांसंदर्भात नागरिकांची तपासणी करण्यात आली.
तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेत त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. अनेक नागरिकांनी आपल्या आरोग्याशी संबंधित समस्या डॉक्टरांशी मांडून उपचार, तपासण्या आणि पुढील काळजीबाबत सल्ला घेतला.
मान्यवरांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रवीण स्वामी होते. यावेळी जि.प. धाराशिवच्या उपाध्यक्षा सौ. उषाताई गायकवाड तसेच उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. @helloomerga
कार्यक्रमास कृ.उ.बा.स. उमरगाचे सभापती बसवराज कस्तुरे, जि.प. सदस्य सौ. अर्चनाताई जाधव, पं.स. उमरगाचे सदस्य तुकारामभैया जाधव, तुरोरीच्या सरपंच सौ. मयुरीताई जाधव, स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकासदादा जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
‘१०० शनिवार–१०० गाव’ हा आरोग्यसेवेचा संकल्प
ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने ‘१०० शनिवार–१०० गाव’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शहरांमधील तज्ज्ञ वैद्यकीय सेवा ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येत आहे.
आरोग्य तपासणीअभावी अनेक आजारांचे निदान उशिरा होते. ही बाब लक्षात घेऊन गावागावांत मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटलने केला आहे. त्यामुळे या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून, हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
डॉक्टर व हॉस्पिटल स्टाफचे योगदान
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. सुभाष येळापूरे (कन्सल्टंट फिजिशिअन), डॉ. निलेश सुभाष येळापूरे (छाती विकार, मधुमेह व अतिदक्षता तज्ज्ञ) आणि डॉ. नेहा निलेश येळापूरे (स्त्रीरोग, प्रसूती व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ) यांनी विशेष योगदान दिले.
तसेच हॉस्पिटल स्टाफमधील डॉ. स्नेहा मोहिते, सचिन राठोड, कैलास गायकवाड, रजनीकांत पाटील, रमेश सूर्यवंशी, कोमल कांबळे, प्रियांका, वैष्णवी माने आणि अतुल कुंभार यांनी शिबिराच्या नियोजन व व्यवस्थापनासाठी सहकार्य केले.
नियोजनबद्ध आरोग्यसेवा, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे तुरोरीतील पहिले आरोग्य शिबिर यशस्वी ठरले. ‘१०० शनिवार–१०० गाव’ या अभियानाच्या माध्यमातून पुढील काळात आणखी गावांमध्ये मोफत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.







