उमरगा | प्रतिनिधी
अनुसूचित जाती (SC) अंतर्गत आरक्षणाचे उप-वर्गीकरण (Sub-Categorization) लागू करण्याच्या समर्थनार्थ गुरुवार (दि. २४) रोजी सकल मातंग समाज, उमरगा व लोहारा तालुक्याच्या वतीने उमरगा शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात दोन्ही तालुक्यांतील हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या मोर्चामुळे परिसर घोषणांनी दणाणून गेला.
मोर्चासाठी माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार सुधाकर भालेराव, आझाद क्रांती सेनेचे राजेशभाऊ गोंडे, लहुजी शक्ती सेनेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, आधुनिक लहुजी शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा नागिनाताई कांबळे, आधुनिक लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते लक्ष्मण क्षिरसागर, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता हुतात्मा स्मारकापासून मोर्चाला प्रारंभ झाला. आंदोलकांनी हातात पिवळे ध्वज आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन घोषणाबाजी करत शहरातून मोर्चा काढला. मोर्चाची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आयोजित जाहीर सभेने झाली. सभेत उपस्थित मान्यवरांनी आरक्षण उप-वर्गीकरणाच्या समर्थनार्थ आपली भूमिका स्पष्ट करत शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.
निवेदनातील प्रमुख मागण्या
मोर्चानंतर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पुढील मुद्द्यांवर भर देण्यात आला:
- सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीतील उप-वर्गीकरणाचा अधिकार राज्य सरकारांना दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत.
- आरक्षणाचा लाभ सर्व जातींना समान प्रमाणात मिळालेला नसल्याने अतिमागास व वंचित घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून अपेक्षित केलेल्या सामाजिक समतेच्या उद्देशाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.
- महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची राज्यात तातडीने अंमलबजावणी करून आरक्षणाचे न्याय्य उप-वर्गीकरण करावे.
मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती
या मोर्चात दिलीप गायकवाड, शिवाजी गायकवाड, संजय सरवदे, बालाजी गायकवाड, विजय तोरडकर, राजूभाऊ शिंदे, ॲड. सुखदेव होळीकर, दीपक रोडगे, विशाल गायकवाड, सुधाकर बनसोडे, राम कांबळे, बबन बनसोडे, संजय कांबळे, मारुती क्षिरसागर, बालाजी साने , किरण,सतीश कांबळे, भाग्यश्री सुरवसे, नितीन शिंदे, माधव वाघमारे यांच्यासह उमरगा व लोहारा तालुक्यातील सकल मातंग समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आरक्षणातील उप-वर्गीकरणाच्या मागणीसाठी आयोजित या मोर्चामुळे उमरगा शहरात दिवसभर आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले असून, शासनाने या मागणीची दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली.








