संपूर्ण गावासाठी आणि परिसरासाठी प्रेरणादायक आणि भावनिक ठरलेली बातमी म्हणजे सुशिल कोकाटे यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) – एअरफोर्स विंग मध्ये यशस्वीपणे प्रवेश मिळवला आहे. हे यश केवळ एका तरुणाचं नाही, तर एका कुटुंबाच्या संघर्षाचं, त्यागाचं आणि स्वप्नपूर्तीचं प्रतीक आहे.
सुशिल यांचे वडील हे निवृत्त सैनिक आहेत. त्यांनी देशासाठी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षं समर्पित केली. त्या सैनिकी जीवनातील शिस्त, देशप्रेम आणि बलिदानाची शिकवण सुशिलने लहानपणापासूनच पाहिली आणि मनावर कोरून घेतली. वडिलांच एकच स्वप्न – “माझा मुलगा पण देशासाठी गणवेश घालेल,” हे आज सत्यात उतरले आहे.
आई या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सुशिलच्या मनात ज्ञान, मूल्यं आणि राष्ट्रसेवेची भावना रुजवली. रोज सकाळी शाळेत जाणाऱ्या आईच्या हातात पुस्तकं आणि वडिलांच्या आठवणीत भरलेला देशप्रेमाचा वारसा – या दोघांनी मिळून एक अधिकारी घडवला.
सुशिलची ही वाटचाल सोपी नव्हती. अनेक अडचणी, मर्यादा, अपयशं यावर मात करत, दिवस-रात्र अभ्यास करून, कठोर प्रशिक्षण स्वीकारून त्यांनी NDA मध्ये स्थान मिळवलं आहे. त्यांच्या डोळ्यांत आजही आपल्या आई-वडिलांची मेहनत, त्याग आणि आशीर्वाद झळकत आहेत.
गावात आनंदोत्सवाचं वातावरण आहे. “सुशिल केवळ कोकाटे कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण गावाचा मुलगा आहे,” असे गावकऱ्यांचे भावूक शब्द आहेत.
हॅलो उमरगा परिवारातर्फे चि. सुशील कोकाटे यांना मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा! त्यांच्या यशाची गाथा अनेकांना देशसेवेसाठी प्रेरणा देत राहो.









