उमरगा तालुक्यातील डिग्गी बेडगा परिसरात काल रात्री प्रचंड प्रमाणात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतजमीन, सोयाबीन, तूर, ऊस, फळबागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक घरे पडझड झाली आहेत. शेतरस्ते व पिके पाण्याखाली जाऊन शेतकरी हवालदिल झाला आहे.
पावसाची तीव्रता एवढी मोठी होती की, पर्जन्यमापक यंत्र असते तर 200 ते 300 मिमी पावसाची नोंद झाली असती, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. आधीच शेतमालाला बाजारभाव नाही, त्यात अतीवृष्टीचे संकट आल्याने शेतकरी ‘जगावं का मरावं’ अशा अवस्थेत पोहोचला आहे.
या आपत्तीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हॅलो उमरगा हे स्थानिक माध्यम स्पॉट पंचनाम्यासाठी तत्परतेने उपस्थित राहिले. शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचे काम सतत सुरू असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.
डिग्गी बेडगा येथील प्रदीप रावण कोकळे व विजयकुमार हणमंत कोकळे यांच्या केळीच्या पिकात सहा ते सात फूट पाणी साचले आहे. या घटनेची पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी माचन्ना, सगर तलाठी तसेच उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी सर व शेतकरी उपस्थित होते.
👉 शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी व योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.