उमरगा : उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघातील विविध गावात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून,शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण स्वामी यांनी दि.28 रोजी आपल्या विधानसभा मतदारसंघातील डिग्गी, बेडगा आणि जहागीर चिंचोली या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करुन, तात्काळ पंचनामे करून शासनाकडून तातडीची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
मागील काही दिवसांपासून उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघातील परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे, बर्याच ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना, “हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला,” अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, “मी तुमच्यासोबत आहे. या नुकसानीची माहिती मी थेट मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना देणार आहे. लवकरच पंचनामे सुरू केले जातील आणि मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः वैयक्तीक जातीने प्रयत्न करणार आहे.” त्यांच्या या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.
याप्रसंगी मंडळ अधिकारी माचन्ना एस. ए. ,कृषी मंडळ अधिकारी पी. एस.भोसले ,कृषी सहाय्यक आर. डी. पाटील , बेडगा चे ग्राम महसूल अधिकारी पी. एस. आष्टे, डिग्गी चे ग्राम महसूल अधिकारी एस. एस. सगर, विजयकुमार नागणे, सुधाकर पाटील, दत्तात्रय शिंदे ,चंद्रकांत माने, सुनिल माने, बालाजी माने, गोपाळ माने ,राहुल गावडे, मलिंनाथ सोंडे, सुरेश कुंभार, किरण जमादार, तानाजी माने, धोडू ठाकूर, नितीन ठाकूर,गावचे सरपंच, उपसरपंच, तसेच स्थानिक पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.