नुकतेच निधन पावलेले आतरराष्ट्रीय तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना येथील कलाविश्व साहित्य मंडळाच्या वतीने सांगितिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्येष्ठ तबलावादक, संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम नुकताच येथील कला विश्व साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. येथील प्रा. डॉ. विनोद देवरकर यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात उस्ताद झाकीरभाई यांच्या प्रतिमेस बाबू स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना शैलेश महामुनी यांनी झाकीरभाई एक कलाकार म्हणून हिमालयाच्या उंचीचे होते तथापि त्याच्याकडे असलेली परकोटीची विनम्रता हा सर्वच कलावंतांनीं अंगीकारण्यासारखा गुण आहे असे सांगितले. त्यांच्याविषयीचे अनेक किस्से सांगत भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीतासाठी दिलेले त्यांचे अमूल्य योगदान विषद केले. यावेळी त्यांना सांगितिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तालमणी खंडेराव मुळे यांनी तबला सोलोवादन करून त्यांना अभिवादन केले. यामध्ये मुळे यांनी त्रिताल वाजवताना पेशकार, कायदे, तुकडे, परण, चक्रदार आदी अत्यंत सफाईदार पणे वाजवले. उस्ताद झाकीरभाईंचे काही कायदे, गणेश परण याचेही अप्रतिम सादरीकरण त्यांनी केले. त्यांना लहरा साथ शैलेश महामुनी यांनी केली. यानंतर त्यांनी राग यमन मधील काही बंदिशी, नाट्यगीते, गझल आदींचे सुरेल सादरीकरण केले. रसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाला श्री बाबू स्वामी, तोटलवार सर, प्रा. डॉ. वसंत हिस्सल सर, प्रा. वसुंधरा निचत, मनोज मोरे, वरूण देवरकर, सुरज मुळे, अश्विनी भोसले, पद्मजा देवरकर, हॅलो उमरगा चे संपादक बालाजी सर्वसाने, किरण क्षीरसागर आदी संगीत रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विनोद देवरकर यांनी केले तर आभार प्रा निचत यांनी मानले.

