उमरग्यातील महादेवमंदिराचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का ? ब्रह्मा, विष्णु, महेश या तिघांनाही या मंदिरात स्थान आहे.

उमरगा येथील बसस्थानकापासून जवळच असलेले शिवमंदिर चालुक्यकाळातील असून याचा आकार तारकाकृती आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून या मंदिराची बांधणी पंचरथ पद्धतीची आहे. त्रिदलपद्धतीच्या या मंदिराचे अधिष्ठान उंच जोत्यावर आहे. ब्रह्मा, विष्णु, महेश या तिघांनाही या मंदिरात स्थान आहे. या मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप, तीन गर्भगृहे अशी असून प्रत्येक गर्भगृहाला स्वतंत्र सभामंडप आहे. मुख्य मंडपास सहा पायऱ्या आहेत. या पायन्याच्या दोन्ही बाजूस कलात्मक अशी देवकाष्टे आहेत. मुखमंडपानंतर सभामंडप, मंडपातील मध्यवर्ती रंगशालेचे स्तंभ तसेच मंडपातील इतर स्तंभ अलंकृत आहेत. भौमितिक आकार, कीर्तीमुखाच्या कलाकृती, शिवनृत्य, सप्तमातृका, अष्टदिक्पाल आणि शोभायमान छत ही येथील वैशिष्टये ठरतात. येथील मंडप नवरंग पद्धतीचा आहे.

अंतराळातील सुंदर चौरीधारिणी, प्रवेशद्वारावरील मनोवेधक द्वारपट्टी, भौमितिक शिल्पाकृती संगीतसाधनांनी युक्त नृत्यांगना आणि लॅटल छतावरील शिवतांडव यामुळे येथील अंतराळचित्र वेधक आहे. अंतराळाच्या छताला आधार देणाऱ्या दोन मगरी बाजूला आहेत, मकर-तोरण आहे. कीर्तीमुख, प्रवेशद्वारावर हत्ती, पोपट, घोडे, वाघ दाखविलेले आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पाचशाखीय असून त्याला शिल्प सिंह, गज, अश्व, शुक आणि पुष्पशाखा दाखविलेली आहे. प्रवेशद्वाराच्या पट्टीकेचा वरचा भाग सुशोभित असून ललाटावरील देवता अस्पष्ट असली तरी मंदिरातील चालुक्य शैलीप्रमाणे गजलक्ष्मीचे शिल्पे असावे. या गर्भगृहाच्या सभागृहाच्या दक्षिणेकडील देवकोष्टात सप्तमातृका आहेत. गर्भगृहात भितीला लागून पिठावर विष्णूची चतुर्भुज मूर्ती आहे आणि खाली शिवपिंड आहे. डावीकडील गर्भगृहात शिवपिंड आहे. उजवीकडील गर्भगृहात समभंग अवस्थेत ब्रह्मा आहे. या दोन्ही गर्भगृहाच्या दरवाज्यावरील शिल्पे वैष्णव आहेत तर मध्यवर्ती गर्भगृहाच्या द्वारावरील शिल्पे शैव आहेत. मंदिराबाहेरील बाजूस जंघा भागावर नऊ सुशोभित देवकाष्टे असून विष्णू, वराह, शिव, नरसिंह, बुद्ध आदि देवता विराजमान आहेत. या मंदिराच्या समोरच नंदिमडप असून येथील नंदि सध्या मंडपात ठेवला आहे.

Join WhatsApp

Join Now