कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी कमी दरात मालवाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने रा.प. महामंडळाद्वारे मालवाहतूक सुविधा सुरू करण्याचे ठरवले आहे. या अनुषंगाने उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. काल या मालवाहतूक बसचे पूजन करून सदर योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
राज्य परिवहन महामंडळाद्वारे यासाठी अत्यंत माफक दर ठेवण्यात आले असून सुमारे 9 टन क्षमता असलेल्या गाडीत 100 किलोमीटर साठी एक टन मालास 500 रुपये इतका दर ठरवण्यात आला आहे. यासाठी सध्या उमरगा आगाराकडे एक मालवाहतुक बस उपलब्ध असून मागणीनुसार आणखी बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तरी राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतूक सुविधेचा जास्तीत जास्त शेतकरी व व्यापारी बांधवांनी लाभ घ्यावा.
या कार्यक्रमास युवा नेते किरण गायकवाड, आगार व्यवस्थापक कुलकर्णी, बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, जेष्ठ शिवसैनिक अशोक सांगवे, बाजार समितीचे संचालक सचिन जाधव, बळीराम सुरवसे, शरद पवार, आदी उपस्थित होते.







