उमरगा येथे भव्य नाट्यगृह उभारण्याची कलावंतांची मागणी

उमरगा : कर्नाटक व आंध्र प्रदेश सीमेलगत असलेला उमरगा तालुका बहुभाषिक बहुल असला तरी मराठी संस्कृतीची परंपरा जपणारा तालुका म्हणून ओळखला जातो. विविधतेत एकतेचे दर्शन घडवणाऱ्या या भागात सांस्कृतिक परंपरा समृद्ध असल्या तरी शासन दरबारी दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये आहे.

सध्याच्या काळात उमरगा तालुका शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती करताना दिसत असला तरी लोककला व नाट्यकला मात्र हळूहळू ऱ्हास पावताना दिसत आहे. एकेकाळी उमरगा शहर व परिसरात रात्रभर चालणारी नाटके, जत्रा, मेळे आणि विविध लोककला सादरीकरणांची परंपरा होती. या ऐतिहासिक सांस्कृतिक वारशामुळे उमरगा तालुक्याची वेगळी ओळख निर्माण झाली होती.

मात्र बदलत्या काळात कलाकारांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने या कलेला उतरती कळा लागली आहे. मोठ्या शहरांप्रमाणे सुसज्ज नाट्यगृह, अत्याधुनिक प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था व प्रेक्षकांसाठी आरामदायी आसनव्यवस्था नसल्यामुळे दर्जेदार कार्यक्रम सादर करणे कठीण होत आहे. उघड्यावरच्या प्रेक्षागृहांबाबत प्रेक्षकांमध्ये वाढलेली उदासीनता ही देखील एक मोठी समस्या बनली आहे.

मुंबई-पुण्याप्रमाणे सुविधा नसल्या तरी उमरगा तालुक्यात उत्कृष्ट लोककलावंत, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि कला अभ्यासक मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळत नसल्याने अनेक कलाकार हवालदिल झाले आहेत. स्थानिक कलाकारांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी हक्काचे सांस्कृतिक केंद्र उपलब्ध व्हावे, अशी मागणी जोर धरत आहे.

यासाठी कलावंतांनी पुढाकार घेत निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे (आमदार) प्रवीण स्वामी, किरण गायकवाड (नगराध्यक्ष) आणि आकांक्षा चौगुले (सभापती) यांना उमरगा येथे भव्य व सुसज्ज नाट्यगृह उभारण्याची मागणी करण्यात आली.

परिसरातील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तन्मय शेटगार, भागवत गायकवाड, किरण क्षीरसागर, पंचाक्षरी स्वामी, बालाजी सर्वसाने, षडाक्षरी स्वामी आणि युवराज गायकवाड यांनी एकत्र येत निवेदन सादर केले.

नाट्यगृह उभारण्यात आल्यास उमरगा तालुक्याच्या सांस्कृतिक विकासाला मोठी चालना मिळेल, नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध होईल आणि लोककला व नाट्यपरंपरा जतन करण्यास मदत होईल, असा विश्वास कलावंतांनी व्यक्त केला आहे.

उमरगा तालुक्यात आधुनिक नाट्यगृहाची उभारणी ही केवळ कलाकारांची गरज नसून सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी काळाची गरज बनली आहे.

Join WhatsApp

Join Now