नाशिकमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांना ‘कार्यक्षम खासदार’ पुरस्कार

धाराशिव | प्रतिनिधी
ओमराजे निंबाळकर यांना प्रतिष्ठेचा “कार्यक्षम खासदार पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व समाजवादी विचारांचे नेते माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो.

नाशिक येथील प. सा. नाट्यमंदिर येथे टिळक पथ परिसरात आयोजित विशेष समारंभात राहुल नार्वेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या पुरस्काराने यापूर्वी राज्यातील अनेक दिग्गज नेते व लोकप्रतिनिधी सन्मानित झाले आहेत. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, भारती पवार यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर खासदार निंबाळकर यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, स्व. माधवराव लिमये यांचे संपूर्ण आयुष्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्यात गेले आणि सामाजिक बांधिलकी जपण्यात त्यांनी आयुष्य वेचले. त्यांच्या स्मृतीशी जोडलेला हा सन्मान मिळणे ही अभिमानाची बाब असून, यामुळे जनतेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला राजाभाऊ वाजे, सीमाताई हिरे, हिमगौरी आडके, प्रा. दिलीपराव फडके, सुनील कुटे, संजय करंजकर, सुरेश गायधने, सचिन महाजन आणि शोभाताई नेरलिनार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, हा सन्मान वैयक्तिक नसून धाराशिवच्या जनतेचा असल्याची भावना खासदार निंबाळकर यांनी व्यक्त केली. शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच संसदेत काम करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी भविष्यात अधिक ताकदीने काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now