शिव भारत प्रतिष्ठानतर्फे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त तालुकास्तरीय भव्य निबंध स्पर्धा संपन्न

हॅलो उमरगा | प्रतिनिधी

शिव भारत प्रतिष्ठान, उमरगा यांच्या वतीने दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त तालुकास्तरीय भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “स्वराज्य निर्मात्या राजमाता जिजाऊ” या विषयावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उमरगा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री. प्रवीण स्वामी, आमदार उमरगा–लोहारा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शकुंतला मोरे (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, उमरगा), शांताबाई शामराव चव्हाण, सौ. शिलाबाई सुरेश मजगे उपस्थित होत्या. तसेच श्री. पद्माकर मोरे (मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला, उमरगा)शिव भारत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रभाकर सुरेश मजगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी नूतन नगरसेविका सौ. ताराबाई महादेव आप्पा दळगडे, स्वाती किरण स्वामी, दिपाली विक्रम बापू बिराजदार यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

निबंध स्पर्धेचे विजेते

या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले—

प्रथम क्रमांक:

  • कुमारी प्रणवी माधव कांबळे, इयत्ता ९ वी – भारत विद्यालय, उमरगा
  • कुमारी अफिया अजम वस्ताद, इयत्ता ९ वी (ब) – जिल्हा परिषद शाळा, उमरगा

द्वितीय क्रमांक:

  • कुमारी मानवी ज्ञानेश्वर जाधव, इयत्ता १० वी (अ) – श्री ज्ञानेश्वर विद्यालय, तुरोरी
  • कुमारी केतकी शिवपुत्र कलशेट्टी – महात्मा बसवेश्वर विद्यालय, उमरगा

तृतीय क्रमांक:

  • कुमारी रोहिणी शेखर बिराजदार – कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा
  • कुमारी वैष्णवी सुधाकर माळी, इयत्ता ८ वी (अ) – शांतेश्वर विद्यालय, सास्तूर

सर्व विजेत्या विद्यार्थिनींना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

आमदार प्रवीण स्वामी यांचे प्रेरणादायी मनोगत

या प्रसंगी आमदार प्रवीण स्वामी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,
“सुमारे ४०० वर्षांपूर्वी इंग्रज, मुघल, पोर्तुगीज व डच सत्ताधीश भारतावर राज्य करत होते. अशा कठीण काळात एका मातेने हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, ती माता म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ. ‘जिजाऊ’ या शब्दातच जीवनपणा, जागृती, बंधनांवर मात करणारा निर्धार आणि ईश्वरनिष्ठा दडलेली आहे. अशा महान मातेच्या जयंतीनिमित्त आयोजित या स्पर्धेबद्दल शिव भारत प्रतिष्ठान, उमरगा यांचे मनःपूर्वक कौतुक करतो.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाचगे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उमरगा येथील सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी शिव भारत प्रतिष्ठान, उमरगा यांच्या वतीने उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे आभार मानण्यात आले.

राजमाता जिजाऊ यांच्या विचारांना उजाळा देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा व स्वराज्याची जाणीव निर्माण करणारा ठरला.

Join WhatsApp

Join Now