मुंबई : समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आमदार प्रवीण स्वामी यांना मानाचा ‘वीरशैवश्री’ पुरस्कार, तर अध्यात्म, वारकरी संप्रदाय आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना ‘विठ्ठल सेवा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही मान्यवरांचा त्यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
हा दिमाखदार सोहळा काशी पीठाधीश्वर श्री. श्री. श्री. १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पावन उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद कर्नाटक सरकारचे ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री तथा महासभेचे अध्यक्ष मा. श्री. ईश्वर बी. खंद्रे यांनी भूषवले.
आमदार प्रवीण स्वामी यांनी समाजसेवा, लोककल्याणकारी उपक्रम आणि सामाजिक एकोप्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना ‘वीरशैवश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अध्यात्म, समाजप्रबोधन आणि सामाजिक जागृतीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव ‘विठ्ठल सेवा’ पुरस्काराने करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना आमदार प्रवीण स्वामी म्हणाले, “हा सन्मान म्हणजे संपूर्ण जनतेचा व समाजबांधवांचा गौरव आहे. पूज्य जगद्गुरूंचे आशीर्वाद आणि ह.भ.प. गहिनीनाथ महाराजांसारख्या संतांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे.”
या सोहळ्यास महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध लोकप्रतिनिधी, संत-महंत तसेच वीरशैव-लिंगायत समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्काराच्या माध्यमातून समाजसेवा आणि अध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव झाल्याने उपस्थितांनी दोन्ही मान्यवरांचे अभिनंदन केले.
आमदार प्रवीण स्वामी आणि ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यावर या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








